लातुरात मांजा विक्रेत्यांवर पाेलिसांचा छापा; एक ताब्यात, नायलाॅन मांजा जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: January 13, 2023 06:48 PM2023-01-13T18:48:29+5:302023-01-13T18:49:06+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
लातूर : शहरातील लेबर काॅलनीत एका दुकानावर पाेलिसांनी छापा मारून बंदी असलेला नायलाॅन मांजा जप्त केला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार नायलाॅन, सिंथेटिक मांजाप्रकरणी कारवाई केली. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा छंद अनेकजण जोपासतात. मात्र, त्यासाठी दोराऐवजी नायलॉन मांजा वापरत आहे. परिणामी, पक्षी, लहान मुले, वाहनधारक जखमी झाले. याबाबत नायलॉन, सिंथेटिक मांजामुळे पर्यावरणाला, पक्षांसाठी धाेकादायक ठरत आहे. अशा नायलॉन मांजावर पाेलिसांची करडी नजर असून, कारवाईसाठी पथक तयार केले आहे. कारवाईसाठी पथकाने माहिती मिळविली. दरम्यान, खबऱ्याने माहिती दिली. त्यानुसार लेबर कॉलनीतील भारत ट्रेडर्स दुकानावर छापा मारला. यावेळी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करताना शेख आगाखान खमरोदीन शेख (वय ५४, रा. लेबर कॉलनी लातूर) याला ताब्यात घेतले. दुकानाची झाडाझडती घेतली असता, ६३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गांधी चौक पाेलिस ठाण्यात गुरनं. २० /२०२३ कलम १८८ भादंवि आणि कलम ५ पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई...
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, अंमलदार रवी गोंदकर, यशपाल कांबळे, रियाज सौदागर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.
बंदी असलेल्या मांजावर आहे नजर...
लातूरसह जिल्ह्यातील पतंग, पतंगाचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी पाेलिसांकडून केली जात आहे. यांना नायलॉन मांजा, इतर विविध प्रकारचा मांजा विक्री करता येणार नाही. याबाबत संबंधित दुकानदारांना समज देण्यात आली आहे. तरीही काेणी कायदा माेडून मांजा विक्री करताना आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.