अवैध धंद्यांवर पाेलिसांच्या धाडी; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर जिल्ह्यात ८३ गुन्हे दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2025 20:57 IST2025-02-17T20:56:43+5:302025-02-17T20:57:26+5:30
एकाच दिवशी झाली छापेमारी, कारवाईचा धडाका

अवैध धंद्यांवर पाेलिसांच्या धाडी; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर जिल्ह्यात ८३ गुन्हे दाखल
राजकुमार जाेंधळे, लातूर: जिल्ह्यातील हातभट्टी अड्ड्यांसह देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर विशेष पाेलिस पथकांनी साेमवारी धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल ५ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, विविध पाेलिस ठाण्यांत ८३ गुन्हे दाखल केले आहेत. पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यात माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असून, याला राेखण्यासाठी अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास लातूर जिल्ह्यात चाेरट्या मार्गाने हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी हातभट्टी दारूनिर्मिती करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या एकूण ८३ जणांविराेधात स्वतंत्र ८३ गुन्हे दाखल केले. यावेळी ५ लाख २१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
३२ पाेलिस अधिकारी अन् ११८ कर्मचाऱ्यांची कारवाई
अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्यासाठी ३२ पाेलिस अधिकारी, ११८ पाेलिस कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली हाेती. एकाच दिवशी विविध ठिकाणी असलेल्या अवैध व्यवसायांवर धाडी टाकल्या. यामध्ये हातभट्टी दारू, हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन, हजारो लिटर देशी-विदेशी दारू असा मुद्देमाल जप्त केला. त्याचबराेबर हजारो लिटर हातभट्टी दारू, रसायन नष्ट केले.