उदगीरमध्ये पोलिसांनी एका चोराकडून जप्त केल्या १८ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:19 PM2019-01-14T17:19:46+5:302019-01-14T17:20:20+5:30
चोरट्याने उदगीर शहर, लातूर, रेल्वे स्टेशन, कमालनगर आदी ठिकाणहुन दुचाकी चोरल्याचे कबुल केले.
उदगीर (जि़ लातूर) : चोरीस गेलेल्या एका बाईकच्या तपासादरम्यान उदगीर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. अधिक माहिती चौकशी केली असता त्याच्याजवळ चोरीच्या १८ दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले़ या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत़
उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील रत्नेश्वर गोगे यांची दुचाकी २२ नोहेंबर २०१८ रोजी चोरीस गेली होती. दरम्यान, शहरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवर्धने भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले़ या पथकाने गोेगे यांच्या दुचाकीचा तपास सुरु केला असता हुसेन नागनाथ कांबळे (रा. गंगापूर, ता.उदगीर, हमु़ उदगीर) याने लातूरनजीकच्या बाभळगाव रोडवरील एका पेट्रोल पंपावरील काम करणा-यास दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती पथकास मिळाली़ त्यावरुन पथकाने तिथे जाऊन मोटरसायकल ताब्यात घेतली
दरम्यान, हुसेन कांबळे यांचा शोध घेऊन ९ जानेवारी रोजी त्यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उदगीर शहर, लातूर, रेल्वे स्टेशन, कमालनगर आदी ठिकाणहुन दुचाकी चोरल्याचे कबुल केले. चोरीच्या दुचाकींचे नंबर प्लेट बदलून सय्यदपूर, स्वत:चे गाव गंगापूर, भाकसखेडा आदी भागात विक्री करीत असल्याचे सांगितले़ त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी एकूण १८ मोटरसायकली जप्त केल्या आहेत़
ही मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवर्धने भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येऊन पथकात पोहे़ सुधाकर केंद्रे, विलास फुलारी, बाळू आगलावे, श्रीहरी डावरगावे, कृष्णा चामे, महेश खेळगे यांचा समावेश होता़
ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या असतील त्यांनी आपल्या दुचाकीची मुळ कागदपत्रे उदगीर शहर पोलीस ठाण्यात आणून जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांनी केले आहे.