बाजार समितीच्या आखाड्यात उतरले राजकीय दिग्गज; १ हजार २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात

By संदीप शिंदे | Published: April 4, 2023 02:51 PM2023-04-04T14:51:09+5:302023-04-04T14:51:27+5:30

लातूर जिल्ह्यात दहा बाजार समित्यांमध्ये १८ संचालकांसाठी निवडणूक होत आहे

Political stalwarts entered the market committee arena in Latur; 1 thousand 248 candidates in the election arena | बाजार समितीच्या आखाड्यात उतरले राजकीय दिग्गज; १ हजार २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात

बाजार समितीच्या आखाड्यात उतरले राजकीय दिग्गज; १ हजार २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या दिवशी १ हजार २४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात अनेक दिग्गजांनीही दंड थोपटले असल्याने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची होणार आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बाजार समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. शिरूर अनंतपाळ वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये निवडणूक सुरू आहे. अर्ज भरण्यास २७ मार्चपासून सुरुवात झाली होती. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून अर्ज नेण्यास पसंती होती. मात्र, अर्ज भरण्याची शेवटची तारीख सोमवारची असल्याने तालुकानिहाय उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळाली.

दहा बाजार समित्यांमध्ये १८ संचालकांसाठी निवडणूक होत असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर बाजार समितीसाठी १७०, उदगीर २०४, देवणी ८५, चाकूर ११७, निलंगा ११२, औराद शहाजानी ११९, रेणापूर १०७, जळकोट ७०, औसा १६४ तर अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १०० असे एकूण दहा बाजार समित्यांसाठी १ हजार २४८ अर्ज दाखल झाले आहेत.

बुधवारी अर्जांची होणार छाननी...
दहाही बाजार समिन्यांमधील उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार, ५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. तसेच ६ एप्रिल रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येईल. ६ ते २० एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर २१ एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच लातूर, औसा, उदगीर, चाकूर या बाजार समित्यांसाठी २८ आणि औराद शहाजानी, निलंगा, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर बाजार समितीसाठी ३० रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.

२२ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क...
बाजार समिती निवडणुकीसाठी २२ हजार १८८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये लातूर बाजार समितीसाठी ५९८२, औसा २७१९, उदगीर ३३७५, चाकूर १४६९, औराद शहाजानी १२७६, निलंगा १७३७, देवणी ९४७, जळकोट १०८९, अहमदपूर २१७५ तर रेणापूर बाजार समितीसाठी १४१९ जण मतदान करतील. दरम्यान, १८ संचालकांमध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण ७, महिला २, इमाव १, भटक्या विमुक्त जाती १, ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १, व्यापारी मतदारसंघातून २, हमाल व तोलारी मतदारसंघातून एक संचालक निवडण्यात येणार आहे.

Web Title: Political stalwarts entered the market committee arena in Latur; 1 thousand 248 candidates in the election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.