भाजपाकडून धार्मिक द्वेषाचे राजकारण; मौलाना सज्जाद नोमानींच परखड मत
By आशपाक पठाण | Published: December 3, 2023 02:46 PM2023-12-03T14:46:02+5:302023-12-03T14:47:20+5:30
विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास हमखास यश
लातूर : केवळ धार्मिक शिक्षणातून आपला विकास होणार नाही. जोपर्यंत धार्मिक, अध्यात्मिक शिक्षणाला विज्ञानाची जोड दिली जाणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही क्षेत्रात प्रगतीपथावर जाणार नाही. देशात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन धार्मिक अजेंडा रेटला जात आहे. यातून केवळ भांडवलदार मोठे होतील, सामान्य माणसाची प्रगती होणे कदापी शक्य नाही, असा दावा मौलाना खलीलुर्रहमान सज्जाद नोमानी यांनी केला.
लातूर येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधताना मौलाना म्हणाले, देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. देशाची खरी शक्ती संविधान आहे, यावर देश चालतो. परंतू काही मनुवादी विचासरणीचे लोक संविधानाला बगल देण्याचे काम करीत आहेत. सरकारला विरोध केला की देशद्रोह ठरविण्याचे काम केले जात आहे. केवळ मुस्लिमांना विरोध करून संपूर्ण देशाचे नुकसान करू नका. आपला देश सामाजिक एकतेवर टिकून आहे. येथील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, ओबीसी, भटके, आदिवासी सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत असताना काही नतदृष्ट लोक दरी निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
अध्यात्म, संशोधनाची शक्ती...
अध्यात्म, संशोधन ज्यांच्याकडे ते कधीही यशस्वी होतात. त्यांना जगाची कुठलीच शक्ती अडथळा निर्माण करू शकत नाही. ही क्षमता आपल्याकडे आहे. पाश्चिमात्य देशाची शक्ती भारताला कमजोर करण्याचे षडयंत्र करीत आहेत. मात्र, अध्यात्म, संशोधनाचे शिक्षण घेऊन तयार होणारी पिढी देशाच्या विकासात अमूल्य योगदान देईल, त्यांना कोणीही रोखू शकणार नाही, असेही मौलाना सज्जाद नोमानी यांनी सांगितले.
एकता ही हमारी पहेचान...
भारताची एकता हीच जगात खरी ओळख आहे. कितीही ध्रुवीकरण केले तरी ते जास्त काळ टिकणार नाही. सरकार भांडवलदार लोकांच्या हिताचे आहे. शासकीय कंपन्या विकून भांडवलदार मोठे केले जात आहेत. यावर कोणी विरोध करू नये, यासाठी हिंदू-मुस्लिम, मंदिर-मस्जिद हा विषय आणला जातो. देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. परंतू इथला सुजाण नागरिक जागा झाला की त्यांची सर्व मनसुबे धुळीस मिळतील.
भारत जगावर राज्य करेल...
जाती,धर्माच्या नावाला ध्रुवीकरण करून शिक्षण, रोजगार, आरोग्य आदी मुद्यांवरील लक्ष विचलित केले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनआरसी, सीएएची भाषा केली जात आहे. विशिष्ट वर्गाची मते एकगठ्ठा मिळाली पाहिजेत, यासाठी भाजपा, आरएसएसचा हा अजेंडा आहे. सामान्य माणूस आता जागा झाला आहे. धार्मिक राजकारणाला बगल देऊन आपण एकसंघ झालो तर जगावर राज्य करू शकतो. आपल्यापुढे कुणाचीही दादागिरी चालणार नाही, असेही मौलाना सज्जाद नोमानी यांनी सांगितले.