प्रदूषण मनभर; दंड कणभर ! पालिकेच्या दुर्लक्षाने लातुरात कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:50 PM2022-03-24T20:50:27+5:302022-03-24T20:51:58+5:30
रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. काही नागरिक तो कचरा पेटून देतात. यामुळे मोठे प्रदूषण होत आहे.
लातूर : शहरात मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे, तर काही ठिकाणी कचरा जाळला जात आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष असून, प्रदूषण वाढत आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेजारी कचरा जाळल्याची घटना घडली. महापालिका प्रशासनाने ५०० रुपयांचा दंड आकारून जुजबी कारवाई केली. प्रदूषण मनभर अन् दंड कणभर अशीच मनपाची ही कारवाई आहे.
लातूर शहरामध्ये महापालिकेच्या वतीने घंटागाडी येते. या घंडागाडीतून घराघरांतील सुका आणि ओला कचरा संकलित केला जातो. मात्र, अनेक नागरिक कचरा घंटागाडीकडे न देता मोकळ्या जागी टाकतात. रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. काही नागरिक तो कचरा पेटून देतात. यामुळे मोठे प्रदूषण होत आहे. दयानंद कॉलेजच्या गेटसमोरील समांतर बार्शी रोडच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या ठिकाणीही कचरा जाळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक नगरातील अनेक ठिकाणच्या मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग आहेत. सकाळच्या सुमारास ते पेटलेल्या अवस्थेत असतात. याकडे मनपाचे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी प्रभाग क्रमांक १५ मधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेजारी दाळमिललगत असलेल्या मैदानामध्ये वाहनाच्या आसनावर कचरा जाळला. या कचऱ्याच्या धुराचे लोट शहरभर पसरले होते. हे किती मोठे प्रदूषण आहे. यासंदर्भात मनपाने संबंधितास ५०० रुपयांचा दंड ठोठावला. किती ही जुजबी कारवाई, असा प्रश्न दररोज शहरात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या अनेकांनी उपस्थित केला.