श्री संत शिरोमणी साखर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:30+5:302020-12-25T04:16:30+5:30
जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक उगिले व सचिन देशमुख यांनी याबाबतचे अधिकृत पत्र कारखाना साईटवर चेअरमन गणपत बाजुळगे यांच्याकडे सुपुर्द करीत ...
जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक उगिले व सचिन देशमुख यांनी याबाबतचे अधिकृत पत्र कारखाना साईटवर चेअरमन गणपत बाजुळगे यांच्याकडे सुपुर्द करीत बँकेच्या ताब्यातील कुलूप काढून हा कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, मारुती महाराज कारखान्याचे व्हा. चेअरमन श्याम भोसले व संचालक मंडळ उपस्थित होते.
सन २००० साली स्थापन झालेला हा कारखाना २०१३ पासून अत्यल्प पाऊस, पाणी व अन्य कारणांमुळे बंद राहिला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर कारखाना सुरू करण्यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, संचालक मंडळाने सातत्याने मुंबई येथे जाऊन सहकारमंत्र्यांशी चर्चा करीत होते. त्यामुळे गेल्यावर्षीही हा कारखाना बंदच राहिला.
यंदा मात्र राज्य शासनाने राज्यभरातील साखर कारखान्यांना थकहमी जाहीर केली. त्यात मारुती महाराज कारखान्याचा समावेश झाल्याने हा कारखाना यंदा सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कारखान्याला लागणाऱ्या यंत्रणेची जमवाजमव सध्या युद्धपातळीवर सुरू असून कारखान्यातील खातेप्रमुखांची निवड अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण करून अन्य कर्मचाऱ्यांचीही लवकरात लवकर भरती करून यंदा कारखाना सुरू करण्याचा मनोदय कारखान्याच्या संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
शब्दांची पूर्तता करणार...
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दांची पूर्तता आम्ही करणार आहोत.
- श्रीशैल्य उटगे, ज्येष्ठ संचालक.