राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला स्थगिती; विद्यार्थ्याच्या तयारीवर पाणी !
By संदीप शिंदे | Published: October 7, 2022 07:56 PM2022-10-07T19:56:32+5:302022-10-07T19:57:14+5:30
केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा : जिल्ह्यात दरवर्षी २ हजाराहून विद्यार्थी देतात परीक्षा
- संदीप शिंदे
लातूर : जिल्ह्यातून प्रतिवर्षी २ हजारांहून अधिक विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा देतात. यामध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी परीक्षार्थ्यांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेची तयारीही करीत आहेत. मात्र, या परीक्षेला केंद्र सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याने या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. आता केंद्राकडून केव्हा मान्यता मिळते, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे.
दरवर्षी राज्यस्तरावर मार्चमध्ये आणि देशपातळीवर डिसेंबरमध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा होते. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रतिमहिना २ हजार रुपये असे वर्षाकाठी एकूण २४ हजारांची शिष्यवृत्ती पीएचडीचे शिक्षण होईपर्यंत मिळते. सोबत स्पर्धा परीक्षेचीही तयारी होते.
जिल्ह्यातून जवळपास २ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. मागील वर्षी राज्यातून ७७४ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यापैकी जिल्ह्यातील ५४ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर पोहचले. तर यातील १४ विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली असून, परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील १२३ शाळांचा सहभाग...
एनटीएसई परीक्षेसाठी जिल्ह्यातील १२३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली जाते. यामध्ये लातूर ५९, अहमदपूरी १२, चाकूर ८, जळकोट २, शिरुर अनंतपाळ ३, देवणी ५, उदगीर १२, औसा ११, रेणापूर ५, निलंगा तालुक्यातील ६ शाळांचा समावेश आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
वर्षांला मिळतात २४ हजार रुपये...
प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेताना प्रतिमहा २ हजार याप्रमाणे वर्षांला २४ हजार रुपये मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक हातभारही लागतो. मात्र, परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याने परीक्षा होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसमोर उपस्थित झाला आहे.
निर्णयाचा पुर्नविचार करण्याची गरज...
एनटीएसई परीक्षेतून गुणवंत विद्यार्थी समोर येतात. सोबतच स्पर्धा परीक्षेचही तयारी होते. उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही होते. मात्र, परीक्षा स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्याचे नुकसान करणार आहे. यावर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. - गोविंद शिंदे, मुख्याध्यापक
३१ मार्चपर्यंतच होती मुदत...
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्राच्या शिक्षण विभागाकडून एनसीईआरटीच्या माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेस ३१ मार्च २०२१ पर्यंतच मुदत होती. मुदत वाढविण्याबाबत केंद्र शासनस्तरावर निर्णय होणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याचे एनसीईआरटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.