उदगीर शहरातील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण
By राजकुमार जोंधळे | Updated: January 28, 2025 21:04 IST2025-01-28T21:03:55+5:302025-01-28T21:04:23+5:30
पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट; १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन

उदगीर शहरातील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण
राजकुमार जाेंधळे, लातूर : उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे निदान झाले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील एक किलोमीटर परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू आहे.
उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेऊन शहरातली कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी रामनगर येथील कुक्कुट पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू विषयक तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरातील देशी आणि व्यावसायिक पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंडी, खाद्यपदार्थ आणि पक्ष्यांचे सर्व अवशेषही नष्ट केले जात आहेत.
नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार...
बर्ड फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राभोवती १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या झोनमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या परीसरात निर्जंतुकीकरण करण्यासोबतच परिसरात कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत.