वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:48+5:302021-01-23T04:19:48+5:30
लातूर : शासनाने वीज थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कडक धोरण अवलंबताना वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा आदेश ...
लातूर : शासनाने वीज थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कडक धोरण अवलंबताना वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा आदेश तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी शुक्रवारी वीज ग्राहक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
वीज ग्राहक संघटनेने वाढीव वीजबिल पूर्णपणे माफ करावे तसेच लाॅकडाऊन काळातील निवासी वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल पूर्णपणे माफ करावे, आदी मागण्या केल्या आहेत. शासनाने वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा दिलेला आदेश तत्काळ मागे घ्यावा अन्यथा वीज ग्राहक व शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असेही या निवदेनात म्हटले आहे.
या निवेदनावर ॲड. उदय गवारे, विजय जाधव, शिवकुमार बनसोडे, ॲड. अजय कलशेट्टी, बसवंत भरडे, सुनील मंदाडे, धर्मराज पाटील, सतीश देशमुख, संजय मोरे, अंतेश्वर कुदरपाके, रमेश राठोड, उमेश राठोड, श्रीकांत राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित केल्यास सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकरी, कष्टकरी व कामगारांवर या निर्णयामुळे संकट येणार आहे.