रेणा प्रकल्प परिसरातील वीजपुरवठा केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:59+5:302021-01-23T04:19:59+5:30
रेणापूर शहरासह तालुक्यातील ३५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम केवळ १७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आगामी ...
रेणापूर शहरासह तालुक्यातील ३५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम केवळ १७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आगामी काळासाठीचे नियोजन करून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यानुसार, तहसीलदार राहुल पाटील, पाटबंधारे विभाग क्र. २चे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, स्थापत्य अभियंत्रिकी डबे, पोलीस निरीक्षक गोरख दिवे व महावितरणचे कनिष्ठ अभियंता विष्णू आघाव यांनी गुरुवारी रेणा मध्यम प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली, तसेच प्रकल्प परिसरातील ३० रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित केला. यावेळी तहसीलदार राहुल पाटील यांनी पाटबंधारे व महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. सिंचनासाठी पाणी उपसा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तेव्हा कर्मचाऱ्यांनी सतर्क राहत प्रकल्पातील पाणी उपसा होणार, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या, तसेच शेतकऱ्यांनी प्रकल्पातील पाणी उपसा करू नये, अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल, असेही तहसीलदार पाटील म्हणाले. यावेळी मंडळाधिकारी नेटके, तलाठी तिडके, पाटबंधारे विभागाचे सुभाष कुंभार हे उपस्थित होते.
शेतीसाठी पाणी उपसा करू नये...
रेणा प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाणी उपसा करू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता व्ही.एन. हिबारे., शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.