औश्यात पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना; सलग तीन दिवस नमाज इस्तिस्काचे पठण
By हरी मोकाशे | Published: September 1, 2023 08:15 PM2023-09-01T20:15:35+5:302023-09-01T20:15:48+5:30
जुम्माच्या नमाजनंतर ईदगाह मैदानावर शेकडो बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा केली.
औसा : तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे पिके करपू लागली आहेत. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असून, जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. एकंदरीत, दुष्काळाची छाया गडद झाली आहे. हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून येथील मुस्लिम बांधवांनी सलग तीन दिवस नमाज इस्तिस्काचे आयोजन केले. शुक्रवारी जुम्माच्या नमाजनंतर ईदगाह मैदानावर शेकडो बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा केली. त्यानंतर सामूदायिक दुआ करून पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.
यावेळी मुफ्ती बिलाल यांनी नमाजनंतर संबोधन केले. यावेळी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुआ मागितली. भूतलावरील मनुष्य सत्य मार्ग सोडून चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असल्याने पापाची उत्पत्ती होते. त्याचे फलस्वरूप म्हणून नैसर्गिक कोपाला सामोरे जावे लागते. ईश्वरा तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि भरपूर पाऊस होऊ दे. आम्ही आज तुझ्याकडे दयेची भीक मागतो. तुझ्याकडे केलेली याचना रिकामी जात नाही. या नैसर्गिक आपत्तीपासून आमचा बचाव कर. तुझी लेकरे वणवण भटकत असून, तूच या संकटातून आमची सुटका करू शकतोस. मोहम्मद पैगंबरांनी जो सत्यमार्ग दाखविला, त्या मार्गावर चालण्याची आम्हाला सद्बुद्धी दे. नैसर्गिक संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केली. मजलिस-ए-उलमा औसा यांच्यातर्फे या नमाजचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता पुन्हा नमाज होणार आहे.