राष्ट्रपतींचा दौरा रद्द; सारस्वतांचा हिरमोड, आता साहित्य रसिकांना आभासी पद्धतीने करणार संबोधित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:03 PM2022-04-22T13:03:59+5:302022-04-22T13:08:07+5:30
कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रपती कोविंद आणि राज्यपाल कोश्यारी यांचे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले होते. नंतर त्यात बदल करून समारोप सत्रात राष्ट्रपती उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. सध्याच्या पत्रिकेतील वेळेनुसार संमेलन अध्यक्षांनाही समारोपात पुरेसा वेळ मिळणार नाही.
उदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याने साहित्य रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र, शेवटच्या क्षणी राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाला. गुरुवारी सायंकाळी ही बातमी धडकली आणि संमेलनासाठी आलेल्या सारस्वतांचा हिरमोड झाला. मात्र, राष्ट्रपती साहित्य रसिकांना आभासी पद्धतीने संबोधित करणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रपती कोविंद आणि राज्यपाल कोश्यारी यांचे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले होते. नंतर त्यात बदल करून समारोप सत्रात राष्ट्रपती उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. सध्याच्या पत्रिकेतील वेळेनुसार संमेलन अध्यक्षांनाही समारोपात पुरेसा वेळ मिळणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही समारोपाला उपस्थित राहणार आहेत. शिवाय, संमेलनातील ठरावदेखील समारोप सत्रातच मांडले जातात. त्यामुळे राष्ट्रपती आलेच तर या सर्व नियोजित कार्यक्रमांच्या वेळेवर मर्यादा येणार होत्या. मात्र, तरीही राष्ट्रपती महाेदयांच्या येण्याबाबत सर्वांना उत्सुकता होती. त्यावर अखेर पाणी फेरले.
संमेलनाच्या इतिहासात १९५६ मध्ये दिल्ली येथील संमेलनात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उद्घाटक होते. २००४ मध्ये कराडच्या संमेलनाला माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आले होते. सांगलीच्या संमेलनाला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. त्यानंतर आता उदगीरमध्ये राष्ट्रपती येणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले होते.