‘त्या’ महिला फिर्यादीवरच पोलीस प्रशासनाचा दबाव
By Admin | Published: April 15, 2017 12:19 AM2017-04-15T00:19:00+5:302017-04-15T00:20:46+5:30
लातूर : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील लिपिक चंद्रकांत जाधव याच्यावर लातूरची पोलीस यंत्रणा आणि या प्रकरणातील तपास अधिकारी ‘मेहरबान’ झाले
लातूर : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील लिपिक चंद्रकांत जाधव याच्यावर लातूरची पोलीस यंत्रणा आणि या प्रकरणातील तपास अधिकारी ‘मेहरबान’ झाले असून, त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी ‘क्लिनचिट’ दिली जात आहे. विशेष म्हणजे फिर्यादी महिला लोभा गणेश कांबळे यांच्यावर पोलिसांकडून जाणीवपूर्वक दबाव आणला जात आहे.
बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात लोभा कांबळे या कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत़ याच कार्यालयातील प्रमुख लिपिक चंद्रकांत जाधव हा त्यांना २००९ पासून छळत आहे़ या प्रकरणात अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र छळाला कंटाळलेल्या महिलेला कुठलाही न्याय मिळाला नाही़ १३ जानेवारी २०१७ रोजी पोलीस महासंचालकाकडे लोभा कांबळे यांनी लेखी तक्रार केली होती़ या प्रकरणात लोभा कांबळे यांच्या तक्रारीची चौकशी न करता उलट चौकशीच्या नावाखाली त्यांचाच छळ केला जात होता.
अखेर या छळाला कंटाळून ६ एप्रिल २०१७ रोजी बाभळगाव प्रशिक्षण केंद्रातील उपप्राचार्यांच्या दालनात लोभा कांबळे यांनी विषारी द्रव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ या प्रकरणात पोलिसांनी तब्बल पाच दिवसांनंतर चंद्रकांत जाधव याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून अद्यापही चंद्रकांत जाधव याला अटक करण्याचे धाडस पोलिसांनी दाखविले नाही़ चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडूनच फिर्यादी महिलेवर दबाव आणला जात असून, सोयीचा जबाब देण्याचेही सांगितले जात आहे.
आरोपीसाठी धडपड...
चंद्रकांत जाधव याच्यावर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक न करता जाणीवपूर्वक तपास यंत्रणेकडून ढिल दिली जात आहे. त्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलिसांकडूनच त्यांची अटक टाळली जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
चंद्रकांत जाधव याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात आहे. याबाबत लोभा कांबळे यांनी लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण आणि शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्याकडे गुन्ह्याची माहिती मिळावी, असा लेखी अर्जही केला आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारातही अर्ज केला आहे. मात्र, चंद्रकांत जाधवबाबतची माहिती देण्यास यंत्रणेकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही कांबळे यांनी केला आहे.