गुगलमॅपवर रस्ता सापडत नाही, सांगता का? मदत मागत गळ्यातील लाॅकेट हिसकावले
By राजकुमार जोंधळे | Published: December 9, 2023 07:13 PM2023-12-09T19:13:50+5:302023-12-09T19:14:02+5:30
रेणापूर तालुक्यात वाटमारी
लातूर : जिल्ह्यातील कारेपूर-यशवंतवाडी मार्गावर एका नाेकरदाराला वाटेत अडवून दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी हा रस्ता काेणीकडे जाताे, अशी विचारणा करून, त्यांच्या गळ्यातील जवळपास ९० हजार रुपयांचे साेन्याचे लाॅकेट हिसकावत पळ काढला. ही घटना शनिवारी घडली असून, याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात दाेघा अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील रहिवासी बंडू व्यंकटराव काळे हे कारेपूर ते यशवंतवाडी दरम्यान शेतातील घराकडे जात हाेते. दरम्यान, त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले दाेघे जण दुचाकीवरून (एमएचओ १ ईपी १२७९) आले. दादासाहेब माने यांच्या शेतानजीक दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी त्यांच्यासमाेर दुचाकी आडवी लावून वाट अडवली. यावेळी ते म्हणाले, आम्हाला गुगलवर रस्ताच सापडत नाही, हा रस्ता काेणीकडे जाताे, असे विचारण्याचा बहाणा केला.
यावेळी बंडू काळे यांची दिशाभूल करत काही कळायच्या आत गळ्यात असलेले साेन्याचे लाॅकेट हिसका मारून पळ काढला. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला, मात्र आराेपी दुचाकीवरून पसार झाले. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आराेपींचा पाेलिसांकडून माग काढला जात आहे.