निलंगा तालुक्याचे विभाजन रोखा; कृती समितीचे लाक्षणिक उपोषण
By हरी मोकाशे | Published: July 24, 2023 05:35 PM2023-07-24T17:35:38+5:302023-07-24T17:35:50+5:30
कासारशिरसीचे अप्पर तहसील कार्यालय गैरसोयीचे
निलंगा : कासारशिरसी येथील अप्पर तहसील कार्यालय आमच्या गावांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे आमची गावे अप्पर तहसील कार्यालयाशी जोडू नका. तसेच निलंगा तालुक्याचे विभाजन करू नका, अशी मागणी करीत कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीच्या वतीने सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
औसा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या निलंगा तालुक्यातील ६३ महसुली गावांसाठी कासारसिरसी (ता. निलंगा) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाने आदेश काढला आहे. तेथून कासारशिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी अशा ६३ महसुली गावांचा प्रशासकीय कारभार चालणार आहे. दरम्यान, त्यास कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीने विरोध करीत लाक्षणिक उपोषण केले.
आम्हाला निलंग्याचे तहसील व पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, पोलिस अधिकारी, सहकार, भूमिअभिलेख कार्यालय, न्यायालय सोयीचे आहे. एकाचवेळी विविध विभागांची कामे करता येतात. शिवाय, निलंगाजवळ असल्याचा ठराव तालुक्यातील जवळपास ४५ ग्रामपंचायतींनी घेऊन आम्हाला निलंगा तहसील कार्यालयातच ठेवाचे, अशी मागणी केली आहे.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी तालुक्याचे कधीही विभाजन होऊ दिले नाही. विविध विभागीय व उपविभागीय कार्यालये येथे आणली. मात्र आता तालुक्याचे तुकडे पाडण्याचे काम काही राजकारणी करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजी तारे, कार्याध्यक्ष अशोक सूर्यवंशी, सचिव दयानंद मुळे, उपाध्यक्ष रामकिशन सावंत, अनिल आरीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाविकास आघाडीचा पाठिंबा...
उपोषणस्थळी भेट देऊन कृती समितीच्या मागणीस महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) अविनाश रेशमे, काँग्रेसचे डॉ. अरविंद भातांब्रे, राष्ट्रवादीचे पंडित धुमाळ, दयानंद चोपणे, इस्माईल लदाफ, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, अमोल सोनकांबळे, धम्मानंद काळे, विलास सूर्यवंशी, विलास माने, देवदत्त सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संतप्त जमावाने आमदार अभिमन्यू पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.