तुरीची आवक वाढली, दरातही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:44+5:302021-02-05T06:22:44+5:30
यंदा सुरुवातीच्या काळात तुरीचे पीक चांगले होते. परंतु, फूल, फळ धारणीच्या कालावधीत अचानक वातावरणात बदल झाल्याने काही भागातील पीक ...
यंदा सुरुवातीच्या काळात तुरीचे पीक चांगले होते. परंतु, फूल, फळ धारणीच्या कालावधीत अचानक वातावरणात बदल झाल्याने काही भागातील पीक वाळून गेले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उतारा ५० टक्क्यांपेक्षा कमी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्पादनात झालेली घट व आगामी काळातील मागणी लक्षात घेता, स्थानिक कारखानदारांकडून तुरीला चांगली मागणी असल्याने दर चढत आहेत. बुधवारी चांगल्या प्रतिच्या तुरीला ६ हजार २५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
आगामी काळात तुरीची आवक वाढली तरी दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यातून व्यक्त होत आहे. बाजारात दर चांगला असल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र ओस आहेत. एकीकडे तुरीला दर चांगला भाव मिळत असला तरी सोयाबीनचे दर मात्र दोलायमान स्थितीत आहेत. गेल्या आठवड्यात ४ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल असलेला सोयाबीनचा दर सध्याच्या आठवड्यात ४ हजार ३०० रुपयापर्यंत खाली उतरला आहे.
वायदे बाजारात तेलाच्या दरात घसरण...
सहा दिवसापासून वायदे बाजारात तेलाच्या दरात घसरण होत असल्याने सोयाबीनचे दरही कमी होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर कमी होत आहेत. आगामी काळात बाजारात करडी, भुईमूग दाखल होण्याची शक्यता असल्याने तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात मोहरीचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. या भागात मोहरीच्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे सोयाबीनच्या तेलाला मागणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने सोयाबीनच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.
साेयाबीनचा सर्वसाधारण दर ४,३०० रुपये...
बुधवारी येथील बाजारात आठ हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक होती. तुरीची आवक सहा हजार पोत्यापेक्षा जास्त होती, असे बाजार समितीचे प्रभारी सचिव एन.डी. हंगरगे यांनी सांगितले. चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला ४ हजार ३३५ प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण भाव ४ हजार ३०० राहिला.
काही काळ अस्थिर दर...
उत्तर भारतात मोहरीच्या तेलाला फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांमध्ये मोहरीची उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भागात दररोजच्या स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल प्रामुख्याने वापरले जाते. तसेच अमेरिकेमध्ये झालेले सत्तांतर व ब्राझीलमधील पीक परिस्थितीमुळे सोयाबीनचा वायदे बाजार अस्थिर असल्याने दर स्थिर नाहीत. अशीच परिस्थिती काही काळात राहणार असल्याचे व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.