बाजारपेठेत तुरीचे दर वधारले; पण सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच, शेतकऱ्यांची चिंता वाढली
By संदीप शिंदे | Published: January 17, 2024 05:45 PM2024-01-17T17:45:44+5:302024-01-17T17:50:02+5:30
उदगीर बाजार समिती : बुधवारी तुरीस मिळाला ९२०० रुपयांचा भाव
उदगीर : मागील दोन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी उदगीर मार्केट यार्ड सुरू झाले. बाजारात तूर व सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होती. मागील पंधरवड्यात तुरीच्या दरात झालेली घसरण आता थांबली असून, तुरीचे दर वाढलेले आहेत. परंतु, सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. त्यामुळे हे दर कधी वाढतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होऊन ८ हजार ६०० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. हंगामाच्या सुरुवातीला असलेला ११ हजार रुपयांचा दर ८५००च्या घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या होत्या. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तूर, वाटाणा या कडधान्याची आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाली होती.
परंतु, आयातीत माल येण्यास वेळ असल्याकारणाने व सध्या डाळीला मागणी चांगली असल्याने तूर दरात वाढ होऊन बुधवारी चांगल्या प्रकारच्या तुरीची ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे तुरीचे पीक मोजक्याच शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांकडे तुरीचे पीक हाती लागलेले आहे. उदगीर भागातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २०० रुपये असलेला दर वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्री करण्याच्या ऐवजी घरीच साठवून ठेवलेला आहे.
आयात वाढत असल्याने दरात घसरण...
चालू वर्षामध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढू न देण्याच्या मन:स्थितीत शासन असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे स्टॉक लिमिटसारखे नियम करून व्यापाऱ्यांची कोंडी करण्यात आलेली आहे. सोबतच देशांतर्गत चांगले उत्पादन झालेले असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात कडधान्य व खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
सोयाबीनला ४६७० रुपयांचा मिळाला दर...
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे रब्बीचे उत्पादन झालेले नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीनचेच पीक शिल्लक आहे. त्यालाही भाव नसल्यामुळे बी-बियाणे, खते, फवारणीचे औषधे यांचा खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीन विक्री करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ज्यांना आर्थिक अडचण आहे, असे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत, बुधवारी बाजारात सोयाबीन ४ हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले.