लातुरात पिवळ्या ज्वारीचे भाव वाढले; गव्हाचे दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:40 AM2018-12-19T11:40:46+5:302018-12-19T11:42:30+5:30
बाजारगप्पा : लातूर येथे पिवळ्या ज्वारीच्या सर्वसाधारण दरात २०० रुपयांनी वाढ झाली
- हरी मोकाशे (लातूर)
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे पिवळ्या ज्वारीच्या सर्वसाधारण दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, प्रतिक्विंटल ४५०० रुपयांपर्यंत भाव वाढले आहेत़ गव्हाचे दर मात्र स्थिर असून, सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळत आहे़
येथील बाजार समितीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून शेतमालाची आवक होते़ यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने खरिपातील शेतीमालाच्या उत्पादनात जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे़ साधारणत: उडीद, मुगाची विक्री दीपावलीच्या कालावधीत झाली़ काही सधन शेतकरी आणखी महिनाभराने चांगला भाव मिळेल, या आशेवर होते, त्यामुळे हे शेतकरी सध्या मूग, उडीद हा शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत़ त्यांना काही प्रमाणात दरवाढही मिळत आहे; परंतु शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा ८०० ते १८७५ रुपये कमी आहे़ सध्या मुगाची आवक ३७७ क्विंटल असून, सर्वसाधारण दर ५१०० रुपयांपर्यंत राहिला आहे, तसेच उडदाची आवक ४४३ क्विंटलअसून, ४८०० रुपये भाव मिळत आहे.
सीमावर्ती भागातून बाजरीची आवक वाढत आहे़ त्याचबरोबर कमाल दरातही शंभर रुपयांनी वाढ झाली असून, सर्वसाधारण दर १७५० रुपये मिळत आहे़ गव्हाची आवक आणि दरही स्थिर राहिला आहे़ २५०० रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे़ रबी ज्वारीच्या दरात शंभर रुपयांनी वाढ होऊन २७०० रुपयांपर्यंत भाव पोहोचला आहे़ पिवळ्या ज्वारीची आवक निम्म्याने घटून १०६ क्विंटल अशी होत आहे़ कमाल दर ४७५० रुपये आहे़ सर्वसाधारण दरात वाढ होऊन सध्या ४५०० रुपये असा भाव मिळत आहे़ किमान दर स्थिर राहिला आहे़
जुन्या हरभऱ्याच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांची घसरण झाली आहे़ बाजारपेठेत १ हजार १८ क्विंटलआवक होत असून, कमाल दर ४६०० रुपये, तर सर्वसाधारण दर ४१२० रुपये मिळत आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाणाऱ्या सोयाबीनची आवक स्थिर असून, सध्या १७ हजार ९५८ क्विंटलआवक होत आहे़ कमाल दर ३३९३ रुपये मिळत असून, सर्वसाधारण दर ३३२० रुपये मिळत आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत या दरात अल्पशी घट झाली आहे़ मागील आठवड्यात सर्वसाधारण दर हमीभावापेक्षा अधिक पोहोचला होता.
सध्या बाजारपेठेत मका- १५००, तूर- ४७६०, करडई- ४२००, तीळ- ११५०० आणि गुळाला २४०० रुपये प्रतिक्विंटलसर्वसाधारण भाव मिळत आहे़ पशुधनासाठीचा हिरवा चारा, कडब्याच्या दरात वाढ झाली असून, ३९ रुपयांना पेंढी मिळत आहे़ आवकही घटली आहे़ सध्या बाजारपेठेत ज्वारी, गहू, मका अशा शेतमालाचा दर्जा कमी असल्याने त्यास मागणी कमी आहे़ परिणामी, दर स्थिर राहत आहेत़ हंगामाच्या कालावधीत पाऊसच नसल्याने शेती पिकावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.