लातुरात दीड काेटींचे माेबाइल चाेरणारे जेरबंद; गुन्ह्यातील वाहन जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: September 23, 2023 06:47 AM2023-09-23T06:47:40+5:302023-09-23T06:47:52+5:30
४० लाखांचा मुद्देमाल जप्त...
लातूर : शहरातील चैनसुख राेडवरील माेबाइल दुकान फाेडून चाेरट्यांनी तब्बल १ काेटी ३४ लाख ६७ हजारांचे माेबाइल, घड्याळ, इतर साहित्य लंपास केले. दरम्यान, या चाेरीचा पाेलिसांनी छडा लावला असून, टाेळीच्या म्हाेरक्याला धुळ्यातून उचलले आहे. तर अन्य चाैघांना विविध ठिकाणावरून अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहनासह ४० लाखांचे माेबाइल जप्त केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, संजयकुमार दिलीपकुमार गिल्डा (वय ३८, रा. सेंट्रल हनुमान, लातूर) यांनी तक्रारीत म्हटले आहे. लातुरात चैनसुख राेडवरील ‘बालाजी टेलिकाॅम’ हे माेबाइल दुकान चाेरट्यांनी २८ ऑगस्ट २०२३ राेजी पहाटेच्या सुमारास फाेडले. दुकानात असलेले महागडे माेबाइल, महागडी घड्याळे आणि राेख १२ हजार असा १ काेटी ३४ लाख ६७ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल पळविला हाेता. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. ४३४ / २०२३ कलम ४५७, ३८० भादंविप्रमाणे गुन्हा दखल केला. दरम्यान, पाेलिस पथक आराेपींच्या मागावर हाेते. आराेपी हे मालेगाव (जि. नाशिक) येथील असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार पाेलिसांनी मालेगावच्या चाैघांना विविध ठिकाणाहून अटक केली. तर टाेळीच्या म्हाेरक्याला धुळ्यातून उचलले. त्यांना लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. आराेपीकडून १ काेटी ३४ लाखापैकी जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पाेलिसांनी सांगितले.