अन्नपचनासाठी योग्य आहार महत्वाचा; शिळे अन्न खाणे टाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 05:56 PM2019-02-16T17:56:06+5:302019-02-16T18:05:31+5:30
उन्हाळ्यात होणाऱ्या विविध आजारांना टाळण्यासाठी दक्षता हाच उत्तम मार्ग आहे़
उस्मानाबाद : बदलत्या तापमानाचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो़ विशेषत: हिवाळ्यातून उन्हाळ्याच्या वातावरणात बदल होताना मानवी अन्नपचन प्रक्रियेवरही परिणाम होतो़ रात्रीच्यावेळी शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यताही अधिक वाढते़ त्यामुळे उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे टाळणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ राजाभाऊ गलांडे यांनी दिली़
उन्हाळ्यात होणाऱ्या विविध आजारांना टाळण्यासाठी दक्षता हाच उत्तम मार्ग आहे़ हिवाळ्याच्या कालावधीत मानवांची अन्नपचन प्रक्रिया चांगली असते़ विशेषत: हिवाळ्यात अन्न खराब होण्याचे प्रकार घडत नाहीत़ उलट उन्हाळ्यात या प्रकारात वाढ होते़ योग्य दक्षता न घेतल्यास अन्नातील भाजी विटण्याचे प्रमाण वाढते़ असे अन्नपदार्थ विशेषत: शिळा मांसाहार झाला तर विषबाधा होऊ शकते़ हा प्रकार टाळण्यासाठी अबालवृध्दांनी उन्हाळ्याच्या कालावधीत शिळे अन्न खाणे टाळणे गरजेचे आहे़ उन्हात शारीरिक श्रम अधिक करणाऱ्या नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता असते़ उष्माघात होऊ नये म्हणून उन्हापासून बचावासह अधिक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे़ विशेषत: बाटलीबंद शितपेय अधिक काळ टिकावीत म्हणून त्यात रासायनिक घटक मिसळलेले असतात़ त्यामुळे अशी शितपेये पिणेही टाळणे गरजेचे आहे़
एकीकडे उन्हाळा आणि पाण्याची टंचाई असा दुहेरी प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांसमोर आहे़ मात्र, स्वच्छ पाण्याचा अधिक काळ साठा झाला तर डासांची पैदास होऊन डेंग्यू, चिकन गुनिया, काविळ आदी आजारांचा फैैलाव होऊ शकतो़ त्यामुळे आठवड्यातून एक वेळेस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे़ शिवाय घराच्या परिसरात नाल्या तुंबल्या असतील तर तेथेही डासांची पैदास होते़ त्यामुळे हत्तीरोग, मलेरियासह इतर आजारांना निमंत्रण मिळू शकते़ त्यामुळे परिसरातील नाल्याही वाहत्या राहतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ याशिवाय उन्हाळ्यात स्वाईन फ्ल्यू, चक्कर येणे, ज्वर आदी विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते़ अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी उन्हापासून बचाव करणे, पुरेसा आहार, पाणी भरपूर पिणे, पुरेसी झोप घेणे गरजेचे आहे़ काही शारीरिक त्रास होत असतील तर अधिक वेळ न घालविता जवळील तज्ज्ञ डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधून उपचार घेणेही तितकेच गरजेचे असल्याचे गलांडे यांनी सांगितले़
वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची
आपल्याला आजाराची लागण होऊ नये, यासाठी आपण वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ जेवणापूर्वी, पाणी पिताना हात स्वच्छ धुणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकवेळेस कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना केल्या तर अनेक आजारांना दूर ठेवता येते़