आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी १९ प्रयोगशील शिक्षकांचे विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव
By संदीप शिंदे | Published: September 2, 2022 07:00 PM2022-09-02T19:00:35+5:302022-09-02T19:00:52+5:30
शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने होणार गौरव
लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक व माध्यमिकचा एक प्रस्ताव शिक्षण विभागाने स्वीकारला असून, मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांचा गौरव केला जातो. त्यासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यानुसार प्राथमिकचे १०, माध्यमिकचे ८, तर दिव्यांग शिक्षकांचा एक प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. शिक्षकदिनापर्यंत या प्रस्तावावर निर्णय होणार असून, त्यानंतरच शिक्षण विभागाकडून अधिकृत नावे जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आठ तालुक्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले असून, दोन तालुक्यांतून एकही प्रस्ताव आलेला नसल्याचे समोर आले आहे.