समृद्धी येईल शेतकऱ्यांच्या दारी, सिंचन वाढीसाठी लातूरात खोदल्या जाणार १२ हजार विहिरी!
By हरी मोकाशे | Published: October 18, 2023 07:12 PM2023-10-18T19:12:46+5:302023-10-18T19:13:55+5:30
गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी मगांराग्रारोहयो अंतर्गत कुटुंब समृद्धी मोहीम
लातूर : शेतीचे सिंचन क्षेत्र वाढीबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी, मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने मगांराग्रारोहयोअंतर्गत कुटुंब समृद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात किमान ११ हजार ७९० सिंचन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. दरम्यान, आता मी समृद्ध, तर गाव समृद्ध, गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी मगांराग्रारोहयोअंतर्गत कुटुंब समृद्ध मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेतून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न येत आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने ‘हर खेत को पानी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत सिंचन विहिरी खोदण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एका सिंचन विहिरीसाठी चार लाख उपलब्ध होणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये कार्यारंभ आदेश...
मगांराग्रारोहयोअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची बैठक व लाभार्थी निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव पंचायत समितीस दाखल करणे, छाननी, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता ही ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.
निलंगा तालुक्यास सर्वाधिक उद्दिष्ट...
तालुका - ग्रामपंचायती - उद्दिष्ट
अहमदपूर - ९७ - १४५५
औसा - १०९ - १६३५
चाकूर - ७१ - १०६५
देवणी - ४५ - ६७५
जळकोट - ४३ - ६४५
लातूर - १११ - १६६५
निलंगा - ११६ - १७४०
रेणापूर - ६५ - ९७५
शिरूर अनं. - ४२ - ६३०
उदगीर - ८७ - १३०५
एकूण - ७८६ - ११७९०
मागेल त्याला सिंचन विहीर मिळणार...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सिंचन विहिरीचा लाभ देऊन कुटुंब समृद्ध करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करून लाभ घ्यावा. या योजनेच्या माध्यमातून शेतीचे सिंचन क्षेत्र वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा...
एका सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंचन क्षेत्र वाढणार आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. अल्पभूूधारक शेतकऱ्यांनी विहिरीसाठी ग्रामंचायतीकडे तत्काळ प्रस्ताव दाखल करावेत.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत