कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क निर्णयाचा निषेध; मनसेनं कृषिमंत्र्यांच्या फोटोला घातलं कांद्याचं हार
By आशपाक पठाण | Published: August 22, 2023 06:15 PM2023-08-22T18:15:47+5:302023-08-22T18:16:06+5:30
कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.
औसा (लातूर) : कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा निर्णय कांदा उत्पादकाकरिता अन्यायकारक असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या केंद्रीय व राज्य कृषीमंत्र्यांच्या फोटोला कांद्याचा हार घालून मनसेने तहसील कार्यालया समोर निषेध आंदोलन केले.
सतत असमानी व सुलतानी संकटाचा फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. बऱ्याच वर्षानंतर कांद्याला आता चांगला दर मिळत होता. पण केंद्र शासनाच्या तुघलकी धोरणाचा पुन्हा फटका बसला. कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारले जात असल्याने याचा परिणाम दरावर पडतो. शासन शेतकऱ्यांना फक्त खोटी आश्वासन देवून दिशाभूल करतो. कांदा उत्पादकाला जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यावर चुकीच्या निर्णयाच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस 'कांद्याचे हार घालून निषेध आंदोलन' करण्यात आले. याप्रसंगी सचिन बिराजदार, महेश बनसोडे, मुकेश देशमाने, प्रकाश भोंग, गोविंद चव्हाण, सतीश जंगले, अमोल थोरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.