कंत्राटी नोकरभरतीच्या जीआरची होळी करून निषेध; लातुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
By आशपाक पठाण | Published: September 19, 2023 06:19 PM2023-09-19T18:19:18+5:302023-09-19T18:19:36+5:30
राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे.
लातूर: राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मुळात असंवैधानिक आहे, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात जीआरची होळी करून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे तत्त्व नाकारले आहे का? तसेच, अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे. एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही, म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळायला हवी, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शासनाच्या जीआरची होळी करून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.