एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लातूरच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा

By हरी मोकाशे | Published: November 22, 2023 05:54 PM2023-11-22T17:54:45+5:302023-11-22T17:55:15+5:30

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी

Protest march by NHM contract workers at district office of Latur | एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लातूरच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा

एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लातूरच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा

लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत (एनएचएम) च्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त केला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी जवळपास तीन आठवड्यांपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना यासह अन्य विविध संघटनांचा समावेश आहे. दरम्यान, गत आठवड्यात येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चटणी-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.

बुधवारी जिल्हा परिषदपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कायम करावे, अशा मागणीच्या घोषणा देत लक्ष वेधून घेण्यात आले. एकच नारा, कायम करा, माझे समायोजन, माझी जबाबदारी असे हातात फलक घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

Web Title: Protest march by NHM contract workers at district office of Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.