कचरा समस्येवरून भाजपा युवा मोर्चाची लातूर महापालिकेसमोर निदर्शने
By हणमंत गायकवाड | Published: June 5, 2023 06:15 PM2023-06-05T18:15:28+5:302023-06-05T18:16:09+5:30
दोन दिवसांत कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास जनाक्रोश मोर्चा
लातूर : लातूर शहर महापालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये भाजपच्या कार्यकाळात देशात एक नंबरवर आली होती. परंतु त्यानंतर काँग्रेसची सत्ता आल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर लातूरचे पुन्हा तीनतेरा वाजले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई नाही, कचऱ्याची विल्हेवाट लावलेली नाही. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने सोमवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलकांनी शहरातला कचरा संकलित करून महापालिकेत ढीग केला होता. स्वच्छतेबाबत दखल न घेतल्यास दोन दिवसात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही भाजप युवा मोर्चा ने दिला आहे.
भाजपच्या काळात लातूर महापालिका स्वच्छ शहर सुंदर सर्वेक्षणामध्ये पहिली आली होती. त्यानंतर मात्र अस्वच्छता आहे. घरपट्टीमधून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन होत असतानाही म्हणावे तसे नियोजन झालेले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे देशात एक नंबर असलेली महापालिका अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे. यात मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जागोजागी नाल्या तुंबलेल्या आहेत. अनेक आठवडे व महिनाभरही कचरा उचलला जात नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शहराचे विद्यमान आमदारांचेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे लातूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात भारतीय युवा मोर्चाच्यावतीने ट्रॅक्टरद्वारे कचरा आणून प्रवेशद्वारासमोर टाकला. तसेच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील-कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
आंदोलनात बालाजी शेळके, संजय गिर, बालाजी गाडेकर, शशिकांत हांडे, ॲड. गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष ठाकूर, पूनम पांचाळ, रविशंकर लवटे, धनंजय अवस्कर, अड. पंकज देशपांडे, गजेंद्र बोकन, संतोष जाधव, राजेश पवार, सिद्धेश्वर उकरडे, सुनील डोळसे, प्रगती डोळसे, प्रियांका जोगदंड, अफरीन खान, महादेव पिठले, संतोष तिवारी, सुनील राठी, सचिन जाधव, अजय कोटलवार, गणेश खाडप, आकाश बजाज, पांडुरंग बोडके, आकाश जाधव, अमर पाटील, हनुमंत काळे, चैतन्य फिस्के, आकाश पिटले, निखिल शेटकार, शिवाजी कांबळे, ओम राठोड, बालाजी खाममे, भगवेश्वर धनगर, बप्पा शेळके, अंकुश नरवाडे, हरी आयतनबोणे, मुस्तफा शेख, योगेश गंगणे, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.