अभिमानास्पद! लातुरातील तीन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

By संदीप शिंदे | Published: December 29, 2022 07:23 PM2022-12-29T19:23:00+5:302022-12-29T19:23:19+5:30

अनिता येलमटे, शोभा माने, बालाजी समुखराव यांचा समावेश

Proud! State level teacher award to three teachers from Latur | अभिमानास्पद! लातुरातील तीन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

अभिमानास्पद! लातुरातील तीन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

Next

- संदीप शिंदे
लातूर :
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने २०२१-२२ या वर्षांतील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. यात लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील अनिता येलमटे, वानवडा शाळेच्या शोभा माने तर हासेगाव शाळेचे बालाजी समुखराव यांचा समावेश आहे. 

उदगीरच्या लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील अनिता तुकाराम येलमटे यांनी गेल्या १७ वर्षांपासून दत्तक पालक योजनेतंर्गत १२५ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारले आहे. त्यांचे कथा व कविता संग्रह असे एकूण ६ ग्रंथ प्रकाशित झाले आहे. लोकसहभागातून त्यांनी २० लाखांचा लोकवाट शाळेस जमा करुन दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल राज्य शासनाकडून त्यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला.

औसा तालुक्यातील वानवडा जि.प. शाळेच्या शिक्षिका शोभा दगडू माने यांनी फर्स्ट क्लास फोकस उपक्रमांतर्गत १०० टक्के वर्ग प्रगत केले आहेत. विद्यार्थी लिखित पुस्तकाचे प्रकाशन करीत त्यांनी विद्यार्थ्यांना लिहीते केले. महिला सक्षमीकरण, मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन, शिक्षणाची वारी उपक्रम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. या उपक्रमशील कार्याबद्दल त्यांचा थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

तसेच औसा तालुक्यातील हासेगाव जि.प. शाळेचे डाॅ. बालाजी राजाराम समुखराव यांनी शाळा, केंद्रस्तरावर अध्ययन निष्पत्तीवर आधारित व्हिडीओ निर्मिती केली. तंबाखुमुक्त शाळा, पालकांच्या लोकवाट्यातून शाळेचा विकास, विविध नाविण्यपुर्ण उपक्रम, कोरोनाकाळात ऑनलाईन शाळा, विद्यार्थ्यांची एकमेकांशी इंग्रजीत संवाद आदी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

Web Title: Proud! State level teacher award to three teachers from Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.