शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; सरसकट अनुदान, पीकविम्यासाठी जळकोटात रास्तारोको
By हरी मोकाशे | Published: September 30, 2022 03:53 PM2022-09-30T15:53:06+5:302022-09-30T15:53:33+5:30
यंदा अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि यल्लो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळकोट (जि. लातूर) : अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव व यल्लो मोझॅकमुळे तालुक्यातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली. परंतु, सरसकट अनुदान आणि पीकविमा देण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर मनसे, शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यंदा अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि यल्लो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लागवडीसाठीचा खर्चही पदरी पडण्याची आशा धूसर झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के आगावू रक्कम देण्याचे आदेश दिले असले तरी त्यात चार तालुक्यातील केवळ १४ महसूल मंडळांचा समावेश आहे.
वास्तविक, तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली आहे. पीक उगवल्यानंतर अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यातून बचावलेल्या सोयाबीनवर येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते. तसेच पीकविम्याची २५ टक्के आगावू रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु, शासनाने त्याचा लाभ दिला नाही.
जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, पीकविमा मंजूर करावा, या मागणीसाठी शुक्रवारी मनसेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष महेश देशमुख, तालुका सचिव मधुकर बादुलगे, लक्ष्मण लांडगे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष शिवम चंदनशिवे, गजानन पद्मपल्ले, ऋषिकेश भोंग, वैजनाथ केंद्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.