नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजारांची भरपाई द्या; येरोळमोड येथे रास्तारोको
By हरी मोकाशे | Published: August 22, 2022 12:19 PM2022-08-22T12:19:43+5:302022-08-22T12:21:38+5:30
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपये जमा करण्यात यावेत.
लातूर : अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनसह अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वा. लातूर- उदगीर मार्गावरील येरोळमोड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील उपसरपंच सतीश सिंदाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गोविंद चिलकुरे, मैनोद्दीन मुंजेवार, प्रभाकर पालकर, प्रभाकर परदाळे, बाळू पाटील, गोविंद पोतदार, अमर माडजे आदी सहभागी झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपये जमा करण्यात यावेत. शिरुर अनंतपाळ तालुक्यासह लातूर जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.