'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे
By संदीप शिंदे | Published: December 26, 2022 04:45 PM2022-12-26T16:45:55+5:302022-12-26T16:46:21+5:30
समाजाला आरक्षण तसेच सरंक्षण आणि शिक्षण मोफत मिळायला पाहिजे.
लातूर : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच शासनाने सच्चर कमिशन, रंगनाथ मिश्रा कमिशन, डॉ. महेमुद रहेमान कमिशनद्वारे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला नोकरीमध्ये आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने लातूरच्या तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
मुस्लिम शैक्षणिकदृष्ट्या मागसलेला समाज आहे. या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची नितांत गरज आहे. समाजाला आरक्षण तसेच सरंक्षण आणि शिक्षण मोफत मिळायला पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. लातूर शहरातील गंजगोलाई भागात जे हॉकर्स आणि छोट्या व्यावसायिकांवर बेकायदेशीरपणे बुलडोजर चालविले जाते, दहशत निर्माण करुन त्यांच्यावर कारवाई केली जाते, याबाबीचाही विचार करुन सरंक्षण मिळावे, अशी मागणी संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मोहसीन खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात फेरोज शेख, शादुल शेख, सरफराज मनियार, इरफान बागवान, जबार बागवान, टिपु सुलतान संघटनेचे अध्यक्ष बशीर शेख, तांबोळी खाजा सादिक, सय्यद सरफराज, शेख इस्माईल, तोसील शेख, मंजूर शेख, सोहेल बागवान, अय्याज पठाण, जुनेद अतार आदी सहभागी होते.