भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या गावातील नागरिकांना निवारा द्या; हासोरी ग्रामस्थांचे उपोषण

By राजकुमार जोंधळे | Published: October 18, 2022 02:43 PM2022-10-18T14:43:38+5:302022-10-18T14:43:52+5:30

गेल्या दोन महिन्यापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात आणि परीसरात आत्तापर्यंत भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत

Provide shelter to villagers who feel earthquake; Hunger strike of Hasori villagers | भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या गावातील नागरिकांना निवारा द्या; हासोरी ग्रामस्थांचे उपोषण

भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या गावातील नागरिकांना निवारा द्या; हासोरी ग्रामस्थांचे उपोषण

Next

कासार शिरसी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हासुरीसह परिसरातील जवळपास १५ भूकंपप्रवण गावातील नागरिकांना प्रशासनच्यावतीने तात्पुरत्या स्वरुपात निवारा शेड उभारावेत, या प्रमुख मागणीसाठी  हासोरी (बु.) आणि हासोरी (खु.) या दोन्ही गावातील नागरिकांच्या वतीने हासुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अबाल-वृद्धासह उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात आणि परीसरात आत्तापर्यंत भूकंपाचे अनेक धक्के बसले असून,भूगर्भातून गूढ आवाज येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे गावातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराची भू-वैज्ञानिकांकडून पाहणी करण्यात आली. हे भूकंपाचेच धक्के असण्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत प्रशासनाने मात्र कोणतेही समाधानकारक पाऊल उचलले नाही, असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून, प्रशासनाने या गावातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेड उभारुन द्यावेत, या मागणीसाठी नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. 

दरम्यान, निलंगा येथील प्रभारी तहसीलदार अडसूळ, नायब तहसीलदार उमापूरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. यावेळी गावातील ७६३ घरे असुरक्षित असल्याचे सांगण्यात आले असून, भूकंप पूर्वपुनर्वसनाची जिल्हा स्तरावर कोणतीही तरतूद नाही, मात्र आम्ही जिल्हाधिकारी यांच्या वतीने राज्य शासनाकडे आपल्या मागणीनुसार गावात तात्पुरत्या स्वरूपात मागणी करत आहोत, असेही तहसीलदार अडसूळ यांनी सांगितले.

सीमा भागाला ३.५ रिश्टरचा धक्का...
लातूर आणि बिदर जिल्ह्यातील जवळपास ६८ गावात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दरम्यान, या कर्नाटकातील बिदर शहराला ३.५ रिश्टर स्केलचा परवाच धक्का जाणवल्याने आता सीमा भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Provide shelter to villagers who feel earthquake; Hunger strike of Hasori villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.