दिव्यांगांसाठी ४८ लाखांची तरतूद; लातूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:18+5:302020-12-09T04:15:18+5:30
मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दिव्यांगांना कृत्रिम साहित्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्याभरात शिबिरे घेण्यात आली होती. त्यात जवळपास १२ हजार दिव्यांगांनी ...
मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दिव्यांगांना कृत्रिम साहित्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्याभरात शिबिरे घेण्यात आली होती. त्यात जवळपास १२ हजार दिव्यांगांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील ८ हजार ९९७ लाभार्थी या साहित्याच्या लाभास पात्र ठरले. या साहित्यासाठी जिल्हा परिषदेने दिव्यांग कल्याण निधीतुन ४८ लाख रुपयांचे दायित्व केंद्राकडे वर्ग केले. केंद्राने ७ कोटी २६ लाख रुपये दिव्यांगासाठीच्या विविध साहित्यासाठी मंजूर केले. त्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याकडे पाठपुरावा केला.
लातूर जिल्हा परिषदेने संवेदना ॲपच्या माध्यमातून या सर्व दिव्यांगांसाठीची नोंदणी करण्यासाठीचा डाटा जमा केला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातील दिव्यांगांना भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी म्हणून सोमवारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजनाची बैठक घेण्यात आली, असे जिल्हा परिषदेचे राहुल केंद्रे यांनी सांगितले.
उद्या साहित्याचे वाटप...
या साहित्याचे वाटप १० डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत वर्च्युअल सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे जिल्हा परिषदेचे राहुल केंद्रे यांनी सांगितले.