मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 06:54 PM2019-04-20T18:54:18+5:302019-04-20T18:54:57+5:30
उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्याशी संवाद
- संदिप शिंदे
लातूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर लोकसभा मतदार संघात झालेल्या जनजागृतीमुळे मतदानाचे प्रमाण वाढले़ विशेष म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंगभेद न पाहता लोकांनी मतदान करावे, यावर मोहिमेत भर देण्यात आला़ परिणामी, लातुरात चांगले मतदान झाले, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
प्रश्न : मतदान वाढीसाठी केलेल्या जनजागृतीचा किती फायदा झाला?
- लातूर लोकसभा मतदार संघात आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली़ त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वंयप्रेरणेतून पुढाकार घेतला़ डोक्यावर उन्हाची तीव्रता असतानाही मतदार घराबाहेर पडले़ शिवाय, महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी सखी केंद्र, दिव्यांगाचे सक्षम केंद्र निर्माण केले़ महिला किंवा दिव्यांग सक्षमपणे निवडणूक प्रक्रियेचे काम करू शकतात, हे यातून सिद्ध झाले आहे़
प्रश्न : मोहिमेत कोणत्या विषयावर अधिक भर दिला?
- जनजागरण मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात आले़ ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमातून शाळांमध्ये मतदान केंद्र उभारून विद्यार्थ्यांकडून निवडणूक प्रक्रिया करून घेण्यात आली़ याशिवाय, संकल्पपत्रेही पालकांना पाठविण्यात आली़ महिला, दिव्यांग, अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फतही रॅली काढून जनजागरण झाले़ आई-वडिलांना विद्यार्थ्यांना लिहिलेले संकल्पपत्र हे या मोहिमेत विशेष होते़
प्रश्न : निवडणूक प्रक्रियेत जनजागृतीचे नियोजन कसे होते?
- निवडणूक आयोगाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम देण्यात आला होता़ त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण जाणवला नाही़ स्वीप टीम जनजागृतीसाठी स्वतंत्र होती़ शाळा, महाविद्यालयाचा सहभाग घेऊन जनजागृती झाली़ उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर ते प्रचाराच्या कामात लागले आणि आम्ही मतदार जनजागृतीच्या कामात लागलो़
प्रश्न : जनजागृतीचे नेमके धोरण काय?
- निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे़ नवमतदारांना तसेच इतर मतदारांनाही मतदानाचे महत्व लक्षात आणून देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते़ जात, धर्म, पंथ न पाहता नि:पक्ष व निर्भयपणे मतदानासाठी लोकांचा सहभाग वाढावा यासाठी मोहिम राबविण्यात आली़ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात जनजागृतीची मोहिम यशस्वी झाली़