वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:20+5:302021-02-20T04:55:20+5:30
मास्कविना फिरल्यास १०० रुपयांचा दंड लातूर : कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ...
मास्कविना फिरल्यास १०० रुपयांचा दंड
लातूर : कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्कविना आढळल्यास १०० रुपये दंड व त्यानंतर पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
आरोग्य विभागाने उपाययोजना राबवाव्यात
लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे. नागरिकांनी कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरावा तसेच लक्षणे दिसताच तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वीज बिल भरणा करण्यास प्रतिसाद
लातूर : महावितरणच्या वतीने लातूर परिमंडळात वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या २७ दिवसांत साडेबारा कोटींचा भरणा कृषी पंपधारकांनी केला आहे. परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, जवळपास पावणेदहा लाख ग्राहकांकडे ५ हजार कोटींची थकबाकी आहे. नागरिकांनी वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
अतिवृष्टी अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
लातूर : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने दोन टप्प्यांत निधी वितरीत करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर सदरील निधी वर्ग करण्यात आला. मात्र अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याच्या तक्रारी आहेत. औसा, रेणापूर आणि जळकोट या तालुक्यांतील काही शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. अनुदान तात्काळ देण्याची मागणी होत आहे.
सांचल तोडकर हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सांचल गणेश तोडकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, ॲड. उदय गवारे, आदिमाया गवारे, ॲड. शिवकुमार जाधव, संभाजी नवघरे, अनंत सूर्यवंशी, प्रमोद साळुंके, ॲड. गणेश गोमचाळे, वैशाली यादव-लोंढे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा माहिती कार्यालयात जयंती साजरी
लातूर : येथील जिल्हा माहिती कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक सुनील सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिलीप वाठोरे, अहमद बेग, चंद्रकांत गोधने, अशोक बोर्डे, श्रावणी सोनटक्के, वरदराज सोनटक्के आदींसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दिव्यांगांकरिता व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन
लातूर : समाजकल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने मार्च महिन्यामध्ये दिव्यांगांकरिता विविध अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पेपर बॅग, द्रोण पत्रावळी तयार करणे, लोणचे तयार करणे, झाडू बनविणे, नूडल्स बनविणे, मेणबत्ती बनविणे आदी व्यवसायाचे प्रशिक्षण तालुकास्तरावर देण्यात येणार आहे. तालुका गटविकास अधिकारी यांच्याकडे २६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सभापती रोहिदास वाघमारे, समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत १७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीस कळवावे
लातूर : भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाल्यास तात्काळ विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लक्षणे असलेल्या व्यक्तींनी चाचणी करावी
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदी लक्षणे दिसून येत आहेत. सदरील रुग्ण डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना अनुषंगिक औषधोपचार देण्यात येतात. परंतु, कोविडसदृश्य रुग्णांची कोविड चाचणी आवश्यक असून, शासकीय खाजगी दवाखान्यांत येणाऱ्या आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची कोविड चाचणी करून घ्यावी व रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास तात्काळ उपचार करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या आहेत.
जिल्हास्तरीय तलाव ठेका सभेचे आयोजन
लातूर : मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेअंतर्गत बोली व जाहीर लिलाव पद्धतीने तलाव ठेक्याने देण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तलाव ठेका समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये लातूर जिल्ह्यातील पाटबंधारे तलाव जाहीर लिलाव पद्धतीने ठेक्याने देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावीत आहे.