पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती; लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे शुध्दीकरण
By राजकुमार जोंधळे | Published: July 26, 2024 05:56 PM2024-07-26T17:56:42+5:302024-07-26T17:57:39+5:30
ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात.
लातूर : पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होते. त्यातून जलस्त्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असते. हे पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार यासारखे जलजन्य आजार होऊ शकतात. पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन जलस्त्रोत शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ५ हजार १४३ जलस्त्रोत शुध्द करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात. पावसाळ्याच्या प्रारंभी पाऊस झाल्याने या स्त्रोतांच्या परिसरात पाण्याचा निचरा होतो आणि हे स्त्रोत दूषित होण्याची अधिक शक्यता असते. दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर आदी जलजन्य आजार उद्भवण्याची भीती असते. अशा आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा आरोग्य व पंचायत विभागाच्या वतीने १५ दिवस मिशन जलस्त्रोत शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली.
पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती...
वैयक्तिक व परिसर अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची साठवणूक व्यवस्थित नसणे, अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेले पाणी पिल्याने जलजन्य आजार उद्भवतात. त्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर असे आजार उद्भवतात.
पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत...
स्त्रोत - संख्या
नळ पाणीपुरवठा विहिरी - ८५५
हातपंप/ विद्युत पंप - ३२०७
सार्वजनिक आड/ विहिरी - १०८१
एकूण - ५१४३
निलंगा तालुक्यात सर्वाधिक जलस्त्रोत...
तालुका - जलस्त्रोत संख्या
अहमदपूर - ४३६
औसा - ६८९
चाकूर - ५४०
देवणी - २५१
जळकोट - ३५४
लातूर - ७४३
निलंगा - ८४१
रेणापूर - ४०९
शिरुर अनं. - २२१
उदगीर - ६५९
पावसाळ्यात घ्या अधिक काळजी...
जलजन्य आजारांच्या साथीच्या कालावधीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा. घराबाहेर पडताना घरचे निर्जंतुक केलेेले पाणी सोबत घ्यावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. त्यामुळे पिण्याचे स्त्रोत दूषित होतात. नेहमी हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत. वैयक्तिक व परिसराची स्वच्छता ठेवावी. जुलाब, उलटीचा त्रास होत असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रथमोपचार म्हणून मीठ, साखर व पाणी या जलसंजीवनीचा अथवा ओआरएस पावडरचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
गाव पातळीवर जनजागृती...
ही मोहीम जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेसाठी जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. अशुकेत वैरागे, येसलवाड, बाबू जाबेर सय्यद यांच्यासह आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, जलसुरक्षकांनी सहकार्य केले. दरम्यान, गाव पातळीवर साथीच्या आजारासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
पावसाळ्यात साथीच्या आजारांची भीती...
पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवण्याची भीती असते. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार १४३ जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जलजन्य आजारांच्या कालावधीत नागरिकांची अधिक दक्ष राहून आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.