दूध डेअरीच्या पुनरुज्र्जीवनासाठी पाठपुरावा करणार; मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही
By संदीप शिंदे | Published: August 18, 2023 04:14 PM2023-08-18T16:14:08+5:302023-08-18T16:14:37+5:30
उदगीर येथे शासकीय दूध योजना पुनरुज्र्जीवन समिती व नागरिकांची बैठक शिवाजी महाविद्यालयात पार पडली.
उदगीर : परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती यावी, या उद्देशाने निर्माण करण्यात आलेली दूध डेअरी व दूध भुकटी प्रकल्प मागील काही काळापासून बंद असला तरी आगामी काळात हा प्रकल्प पुनरुज्र्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी येथे दिली.
उदगीर येथे शासकीय दूध योजना पुनरुज्र्जीवन समिती व नागरिकांची बैठक शिवाजी महाविद्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, आशिष पाटील, संतोष कुलकर्णी, अहमद सरवर, मोतीलाल डोईजोडे आदी उपस्थित होते. क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरण्याचे काम सध्या सुरू आहे. वाॅटर ग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आपल्या भागात सुरू असून, दूध डेअरी व एमआयडीसी सारखे प्रकल्प सुरू झाले पाहिजेत, अशी भूमिका आहे. त्यामुळे उदगीर येथील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व अनेकांना रोजगार देणारा शासकीय दूध डेअरी व दूध भुकटी प्रकल्पाचे पुनरुज्र्जीवन करण्याचा माझा मानस आहे. प्रकल्पाची मशिनरी कालबाह्य झाली असेल तर संपूर्ण प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची हमी मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने संबंधित खात्याला देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
इतर पर्यायांसाठी मानसिक तयारी ठेवावी...
दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्र्जीवित करण्यासाठी शासकीय स्तरावरून काही अडचणी आल्यास इतर पर्याय म्हणजेच अमूल डेअरी सारख्याने जर हा प्रकल्प सुरू करण्यास रुची दाखवल्यास या भागातील नागरिकांनी मानसिक तयारी ठेवावी, असे वैयक्तिक मत असल्याचेही क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, प्रा.एस.एस. पाटील, व्यंकटराव पाटील, बलसुरकर आदींनी सूचना मांडल्या.