सरकारी दवाखान्यांची गुणवत्ता वाढली; लातूर जिल्ह्यातील १५५ आरोग्य संस्थांचा गौरव

By हरी मोकाशे | Published: March 13, 2024 04:56 PM2024-03-13T16:56:28+5:302024-03-13T16:56:39+5:30

कायाकल्प योजना : राज्यात सर्वाधिक पारितोषिक लातूर जिल्ह्यास

Quality of government hospitals increased; Honor of 155 health institutions in Latur district | सरकारी दवाखान्यांची गुणवत्ता वाढली; लातूर जिल्ह्यातील १५५ आरोग्य संस्थांचा गौरव

सरकारी दवाखान्यांची गुणवत्ता वाढली; लातूर जिल्ह्यातील १५५ आरोग्य संस्थांचा गौरव

लातूर : सरकारी रुग्णालयातील स्वच्छता व इतर पूरक बाबींसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत घेण्यात आलेल्या कायाकल्प उपक्रमात जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १११ उपकेंद्र तसेच स्त्री रुग्णालय, उदगीरचे सामान्य, निलंग्याचे उपजिल्हा आणि ९ ग्रामीण रुग्णांनी पारितोषिके मिळविली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांची सेवा गुणवत्ता वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: राज्यात सर्वाधिक पारितोषिक मिळविणारा लातूर जिल्हा ठरला आहे.

राज्य शासन आणि स्वच्छ रुग्णालयांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कायाकल्प स्पर्धा घेतली जातेे. या उपक्रमात सहभागी सरकारी रुग्णालयांची अंतर्गत स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्थिती, इमारतींची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णालय परिसर स्वच्छता, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, नोंदी, शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागातील सोयी- सुविधा आदी मुद्द्यांवर परीक्षण केले जाते. दरम्यान, शासनाने नियुक्त केलेल्या पथकाकडून जिल्ह्यातील सरकारी आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली होती.

कासार बालकुंदा आरोग्य केंद्र प्रथम...
जिल्ह्यात कासार बालकुंदा आरोग्य प्रथम आले असून २ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. निटूर, हंडरगुळी, हलगरा, हडोळती, शिरुर ताजबंद, लामजना, वांजरवाडा, देवर्जन, हेर, गुडसूर, अतनूर, जवळा बु., नळेगाव, नळगीर, अंधोरी, पानचिंचोली, चिंचोली ब., जवळगा, बोरी, निवळी, तांदुळजा, गंगापूर, उजनी, चापोली, खरोळा, कारेपूर, भातांगळी, चिखुर्डा, मातोळा, भादा, बिटरगाव अशा ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

किनी यल्लादेवी उपकेंद्र प्रथम...
उदगीर तालुक्यातील किनी यल्लादेवी आरोग्य उपकेंद्र हे जिल्ह्यात प्रथम आले असून एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. काजळ हिप्परग्यास ५० हजार, घोणसी उपकेंद्रास ३५ हजार तर उर्वरित १०८ उपकेंद्रांना प्रत्येकी २५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदअंतर्गतच्या जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ. पल्लवी रेड्डी, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी पाठपुरावा केला.

स्त्री रुग्णालयाने मिळविले यश...
कायाकल्प उपक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गतच्या लातुरातील स्त्री रुग्णालय, उदगीरचे सामान्य आणि निलंग्याचे उपजिल्हा तसेच अहमदपूर, रेणापूर, देवणी, किल्लारी, उदगीर, चाकूर, बाभळगाव, मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयांनी यश मिळविले आहे.

आरोग्य संस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न...
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गतच्या कायाकल्प उपक्रमात लातूर जिल्ह्याने चांगले यश संपादन केले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी आरोग्य संस्था आणखीन अद्ययावत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सेवेचा दर्जा कायम टिकविण्यासाठी प्रयत्न...
कायाकल्पमध्ये जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गतच्या रुग्णालयांनी आपला लौकिक केला आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबरोबर संस्थेचा दर्जा वाढविण्यासाठी उपक्रमातून प्रयत्न करण्यात आले. तो टिकविण्यासाठी कायम प्रयत्न राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

Web Title: Quality of government hospitals increased; Honor of 155 health institutions in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.