चारा-पाण्याचा प्रश्न कायम
By Admin | Published: July 31, 2014 12:30 AM2014-07-31T00:30:33+5:302014-07-31T01:24:52+5:30
औसा : तालुक्यात यावर्षी पावसाला तब्बल महिनाभराने उशिरा सुरूवात झाली़ पेरण्या ही उशिराने झाल्या़
औसा : तालुक्यात यावर्षी पावसाला तब्बल महिनाभराने उशिरा सुरूवात झाली़ पेरण्या ही उशिराने झाल्या़ पाऊस सर्वत्र समान न झाल्यामुळे अजूनही काही भागात पेरण्या झाल्या नाहीत़ ८० ते ९० टक्के पेरण्या झाल्या़ पण अजूनही चारा आणि पाण्याचा प्रश्न मात्र गंभीरच आहे़ पेरण्यापुरता पाऊस झाला़ त्यामुळे पाणीसाठे अजूनही तळातच आहेत़ पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले पण मोठा पाऊस न झाल्यामुळे चारा उपलब्ध झाला नाही़
शेती हाच औसा तालुक्याचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीवर उपजिवीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ जनावरे पाळूण शेती करणारे शेतकरी अधिक आहेत़ तसेच दुग्ध व्यवसायासाठी दुधाची जनावरे सांभाळणारे शेतकरीही बऱ्यापैकी आहेत़ त्यामुळे तालुक्यात दीड लाखाच्या जवळपास पशुधन आहे़ शेती करण्यासाठी दोन बैल तर दुधासाठी एखाद दुसरे जनावर सर्रास शेतकऱ्याकडे पाहायला मिळते़ पण आता पेरण्या झाल्या, पाऊस झाला़ तरीही शेतकरी जनावरांच्या चाऱ्याअभावी त्रस्त आहे़
मागील वर्षी पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पाऊस कमी पडल्यामुळे खरीप हंगामात चारा उपलब्ध झाला नाही़ तर रबी हंगामात पिके चांगली आल्या नंतरही गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन तर हाती लागले नाही़ पण जनावरांचा चारा ही काळा पडला त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला़ शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेला चारा ही संपला़ त्यामुळे आता पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे़ (वार्ताहर)
सांगा जनावरे जगवायची कशी़़़?
महाविर माळी हे शेतकरी म्हणाले २० जनावरे आहेत जमा असलेला चारा संपला़ आता जनावरे जगवायची विकावी म्हटले तरी ग्राहक मिळत नाही़ त्यामुळे जनावरे जगवायची कसे असा प्रश्न सतावतो आहे असे सांगितले़ दशरथ मगर, प्रल्हाद सरतापे, राजाभाऊ थोरात, अनंत पाटील, रूपेश दुबे या शेतकऱ्यांनी ही आशाच प्रतिक्रिया दिल्या़