अनुदान उचलण्यासाठी बँकेसमोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:49+5:302021-05-19T04:19:49+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम लाभार्थी शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तसेच खरीपातील तुरीचा पीकविमाही काही शेतक-यांना मिळाला आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम लाभार्थी शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तसेच खरीपातील तुरीचा पीकविमाही काही शेतक-यांना मिळाला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या शेतक-यांना आधार मिळाल्याने मंगळवारी लाभार्थी शेतक-यांनी जिल्हा बँकेच्या शाखेसमोर पैसे उचलण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कडक उन्हात लाभार्थी शेतकरी एकत्रित थांबल्याचे पाहून जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी तात्काळ बँकेच्या अधिका-यांना सूचना करुन वाहनतळासाठी असलेल्या सावलीच्या जागेत लाभार्थ्यांना थांबण्यास सांगितले. तसेच तिथे पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.
दरम्यान, जळकोट शाखेचे व्यवस्थापक विनोद लोखंडे व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना गर्दी टाळण्याचे आवाहन करून तात्काळ पैसे वाटपास सुरुवात केली. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत झाली. बँकेच्या परिसरात जागा पुरेशी नसल्यास मंडप टाकून शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात यावे. शेतक-यांची गैरसोय होऊ देऊ नये, अशा सूचना बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी बँक व्यवस्थापनाला दिले. त्यामुळे शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांची सोय झाली.