कोविड रुग्णालयासाठी शीघ्र प्रतिसाद कृती दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:54+5:302021-05-16T04:18:54+5:30
अहमदपूर : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ४०० च्या पुढे आहे. त्यातील ६८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या ...
अहमदपूर : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ४०० च्या पुढे आहे. त्यातील ६८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी शीघ्र प्रतिसादक कृती दल तयार करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांच्या आदेशानुसार शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचे अध्यक्ष तहसीलदार प्रसाद कुलकर्णी असून, उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ हे सदस्य आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रंबक कांबळे सदस्य सचिव आहेत. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिरादार, महावितरणचे उपअभियंता प्रदीप काळे, शाखा अभियंता सतीश गुंडे, पालिकेचे अधिकारी सतीश बिलापट्टे, अग्निशमन विभागाचे नागनाथ उपरबावडे व पानपट्टे, ऑक्सिजन सिलिंडरविषयी तज्ज्ञ संतोष लांडगे, राजू बोडगे व इंगळे यांचा समावेश आहे.
या कृती दलामार्फत चारही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सुरक्षाविषयक बाबींकडे लक्ष देण्यात येणार आहे. दुर्दैवाने आग लागणे, ऑक्सिजनची कमतरता, ऑक्सिजन गळती, रुग्णाच्या उपचारात अडचणी या बाबींचे मूल्यांकन होणार आहे. अग्निशमन व्यवस्थेसह संबंधित दररोज अहवाल दिला जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. अहमदपुरात पाच रुग्णालये असून, ग्रामीण रुग्णालयात १२, शिरुर ताजबंदच्या कोविड सेंटरमध्ये आठ, तर खासगी रुग्णालयात ३० रुग्ण आहेत.