ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण
By संदीप शिंदे | Published: February 26, 2024 05:55 PM2024-02-26T17:55:24+5:302024-02-26T17:56:28+5:30
निलंगा तालुक्यातील हालसी हा. येथे वर्षभरापासून ग्रामसभा झालेली नाही.
निलंगा : ग्रामसभेत विकास कामाचा हिशोब मागितल्यामुळे सरपंच पती व मुलाने गावातील एकास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील हालसी हा. येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
निलंगा तालुक्यातील हालसी हा. येथे वर्षभरापासून ग्रामसभा झालेली नाही. याबाबतचा अहवाल ग्रामसेवकांनी लेखी स्वरूपात पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला. तर ग्रामसभा झाली नाही म्हणून ग्रामस्थांनी १३ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना निवेदन दिले. ही माहिती मिळताच २३ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा घेण्याची नोटीस काढण्यात आली. त्यानुसार ग्रामसभेस सरपंच पती दत्तात्रय मनोहर बिराजदार व मुलगा आकाश दत्तात्रय बिराजदार उपस्थित होते. मात्र सरपंच अनुपस्थित होत्या.
याबाबत ग्रामसेवकाने सरपंचांना बोलविण्याबाबत सरपंच पतीकडे आग्रह धरला असता त्या येऊ शकत नाहीत तुम्ही ग्रामसभा घ्या असे सरपंच पतीने सांगितले. ग्रामसभा सुरु झाल्यावर ग्रामस्थ विकासकामांची चौकशी करीत असताना फिल्टर मशीनवर केलेला खर्च, शाळेची रंगरंगोटीबाबत प्रश्न विचारले संतप्त झालेले सरपंच पती दत्तात्रय मोहनराव बिराजदार व मुलगा आकाश यांनी सिद्धेश्वर श्रीमंत बिराजदार यांना मारहाण केली. तसेच धमकी दिली. याप्रकरणी सिद्धेश्वर बिराजदार यांच्या फिर्यादीवरून सरपंच पती व मुलाविरुद्ध कासारशिरसी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्यानुसार ग्रामसभेस सरपंच गैरहजर असलेला अहवाल ग्रामसेवकांनी पंचायत समितीकडे लेखी स्वरूपामध्ये दाखल केला आहे.