निटूर येथे दोन गटांत राडा; तलवार, रॉड, खंजीरने हल्ला, सात जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: March 28, 2025 21:55 IST2025-03-28T21:55:13+5:302025-03-28T21:55:48+5:30
दाेन्ही गटांतील १५ जणांविराेधात गुन्हा

निटूर येथे दोन गटांत राडा; तलवार, रॉड, खंजीरने हल्ला, सात जखमी
निलंगा (जि. लातूर) : मागील भांडणाच्या कारणावरून दाेन गटांत राडा झाल्याची घटना निटूर येथे गुरुवारी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दाेन्ही बाजूंनी तलवार, खंजीर, लाेखंडी राॅड आणि दगडाचा वापर माेठ्या प्रमाणावर झाला. या हाणामारीत सात जखमी झाले आहेत. याबाबत शिरूर अनंतपाळ ठाण्यात १५ जणांविराेधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, निटूर येथील गुरुवारी रात्री जहिराबाद-निटूर-लातूर महामार्गांवर एका हॉटेलासमोर मागील भांडणाची कुरापत काढून हाणामारीला सुरुवात झाली. यावेळी एकच गोंधळ उडाला. यामध्ये तलवार, खंजीर, रॉड, धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. दोन्ही गटांतील सात जणांना गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी तिघा जखमींना पुढील उपचारासाठी लातूरला हलविले आहे. त्याचबराेबर चार जखमींना निलंगा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, घटनास्थळाला सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, फॉरेन्सिक टीम सहायक दत्ता कतलाकुट्टे, पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे, गौतम घाडगे, संदीप टिपराळे, सांडूर यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात संभाजी शिंदे, समीर शिंदे, बुद्धा कांबळे, शुभम शिंदे, सुमित कांबले, समाधान कांबळे, संदीप मचाळे, सचिन मधाळे, समाधान शिंदे, आदेश कांबळे, अविनाश हारणे, माधव साठे आणि राम गजभार, संकेत गजभार, हरी गजभार (सर्व रा. निटूर, ता. निलंगा) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना पाेलिसांनी अटक केली असून, तिघे पसार झाले आहेत.
चारचाकी वाहनांची ताेडफाेड...
मारहाणप्रकरणी तिघा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी तर इतर बारा आरोपींविराेधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. तपास सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे हे करीत आहेत. हाणामारीमध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली असून, घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.