पै. राहुल आवारेची कॅनडा येथील जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत 'सुवर्ण' कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 08:34 PM2023-07-30T20:34:30+5:302023-07-30T20:34:38+5:30

धोंड्याच्या महिन्यात लातूरच्या जावयाने लुटले सोने !

Rahul Aware won 'gold' at the World Police Games in Canada | पै. राहुल आवारेची कॅनडा येथील जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत 'सुवर्ण' कामगिरी

पै. राहुल आवारेची कॅनडा येथील जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत 'सुवर्ण' कामगिरी

googlenewsNext

महेश पाळणे

लातूर : सध्या धोंड्याचा महिना सुरू असून, जावईबापूंचे लाड पुरविण्यात सासरची मंडळी दंग आहेत. या महिन्यात जावयाला धोंडे दान म्हणून सोने देण्याची प्रथा आहे. मात्र लातूरचा जावई असलेला कुस्तीपटू राहुल आवारे यांनी कॅनडा येथे सुरू असलेल्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावीत धोंड्याचा महिना गोड केला आहे.

मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा असलेल्या राहुल यांची सासुरवाडी लातूर जिल्ह्यातील साई या गावची. अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू काका पवार यांचा तो जावई. सध्या कॅनडा येथे सुरू असलेल्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत राहुल आवारे यांनी ५७ किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. पोलिस दलात असतानाही मिळणाऱ्या वेळेत त्यांनी सराव करीत भारतासाठी पुन्हा एकदा सुवर्णपदकाची लूट केली आहे. यामुळे लातूरच्या कुस्ती क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

तिन्ही लढती जिंकल्या १०-० ने...

राहुल आवारे यांनी या स्पर्धेत झालेल्या तिन्ही लढती एकतर्फी जिंकत प्रतिस्पर्धी मल्लांना १०-० ने मात देत अस्मान दाखविले. पहिल्या फेरीत कंबोडियाच्या पहेलवानावर १०-० ने तर दुसऱ्या सामन्यात सिल्व्हॉकियाच्या मल्लालाही १०-० ने मात दिली. अंतिम सामन्यात पोलंडच्या मल्लावरही १०-० ने मात करीत स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक भारतासाठी जिंकले.

‘लोकमत’चा महाराष्ट्रीयन ऑफ द इअर ॲवॉर्ड विजेता...
राहुल आवारे यांच्या कुस्तीतील कामगिरीबद्दल लोकमत समूहाने २०१९ साली लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर ॲवॉर्डने सन्मानित केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबद्दल लोकमतने त्यांना यावेळी गौरविले होते.

पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे सहकार्य...

पोलिस दलात दाखल झाल्यानंतर कुस्तीसाठी पोलिस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्याचेच हे फलित आहे. राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर अधिकाऱ्यांनी मला सरावासाठी वेळ दिला. त्यामुळेच मी जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत पदक जिंकू शकलो. - राहुल आवारे, डीवायएसपी तथा अर्जुन पुरस्कार विजेते

३५ वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर धडक...
पुण्यात एसआरपी ग्रुपमध्ये पोलिस उपाधीक्षक असलेल्या राहुल यांना लहानपणी लातूरचेच गुरु कै. हरिश्चंद्र बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर काका पवार यांच्या तालमीत सराव करीत त्यांनी पदकांची लयलूट केली. ३५ वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या राहुल यांनी २०१८ साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. यासह आशियाई स्पर्धेतही ब्रांझ पदक दोनवेळा पटकाविले आहे.

Web Title: Rahul Aware won 'gold' at the World Police Games in Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.