लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना

By हरी मोकाशे | Updated: February 18, 2025 19:59 IST2025-02-18T19:58:38+5:302025-02-18T19:59:06+5:30

राहुल मीना हे मूळचे राजस्थानमधील असून ते सन २०२१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Rahul Kumar Meena is the new Chief Executive Officer of Latur Zilla Parishad. | लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना

लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना

लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची बदली झाल्याने नव्या सीईओची उत्सुकता लागली होती. मंगळवारी शासनाने राज्यातील काही आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात लातूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून राहुलकुमार मीना यांची बदली झाली आहे. 

आयएएस अधिकारी राहुल मीना हे मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपुर जिल्ह्यातील आहेत. ते सन २०२१ च्या बॅचचे आहेत. ते दीड वर्षापासून गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही दुसरीच पोस्टिंग आहे.

तत्कालीन सीईओ सागर यांनी दीड वर्षाच्या कालावधीत विविध उपक्रम राबवून लातूर जिल्हा परिषदेचा लौकिक वाढविला होता. त्यांची बदली झाल्यानंतर नवे सीईओ म्हणून प्रमोटेड अधिकारी येणार की आयएएस अधिकारी येणार याची चार दिवसापासून चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे. 

आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक लक्ष...
जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचा आढावा घेऊन सर्व विभागाच्या योजना, कामांना गती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासासाठी योजना अधिक प्रभावीपणे राबवू. विशेषतः आरोग्य आणि शिक्षण या दोन विभागाकडे अधिक लक्ष केंद्रित करून सेवा- सुविधांना आणखीन गती देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- राहुलकुमार मीना, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी.

Web Title: Rahul Kumar Meena is the new Chief Executive Officer of Latur Zilla Parishad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.