निलंग्यात चार ठिकाणी छापा; ३३ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: January 6, 2024 09:58 PM2024-01-06T21:58:28+5:302024-01-06T21:58:54+5:30
पाेलिसांची कारवाई : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त...
लातूर : निलंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी सुरू असलेल्या जुगार, मटक्यावर विशेष पोलिस पथकाने एकाचवेळी छापा टाकला. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात शनिवारी ३३ जुगाऱ्यांविरोधात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून २ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय, जुगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते. दरम्यान, चाकूर येथील सहायक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांना खबऱ्याने माहिती दिली. निलंगा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका, जुगारावर एकाचवेळी विविध पथकांकडून छापा टाकण्यात आला. यामध्ये निलंगा येथील शिवाजी चौक ते बँक कॉलनी जाणाऱ्या रोडवर, बँक कॉलनी परिसरात, औराद ते निलंगा मार्गावरील परिसरात आणि पत्र्याच्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईचा समावेश आहे. यावेळी मटका, जुगार खेळताना ३३ जण आढळून आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, असा २ लाख ९४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात ३३ जणांविराेधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) कायद्यान्वये स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.