उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर, निलंग्यात धाडी; कर्नाटकी दारुसाठा जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: March 4, 2023 07:01 PM2023-03-04T19:01:11+5:302023-03-04T19:01:25+5:30
लातूरसह जिल्ह्यात हाेणाऱ्या अवैध दारुविक्री, वाहतूक विराेधात कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने टाेल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
लातूर : जिल्ह्यातील उदगीर आणि निलंगा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाचवेळी अचानक धाडी टाकून कर्नाटक राज्यातील देशी दारु, बिअरचा साठा जप्त केला. दरम्यान, पथकाच्या हाती हातभट्टी गावठी दारु, ताडी, देशी दारुसाठा लागला आहे. याबाबत स्वतंत्र पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उदगीर तालुक्यातील बामणी आणि निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे चाेरट्या मार्गाने कर्नाटक राज्यातील देशी-विदेशी दारु विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती खबऱ्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला दिली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूर आणि उदगीर विभागाच्या पथकाने एकाच वेळी धाडी टाकल्या. या धाडसत्रात कर्नाटक राज्य निर्मिती देशी दारु व बिअर मद्यसाठा हातभट्टी गावठी दारु १०० लिटर, ताडी २२ लिटर व देशी दारु १८० मिलीच्या बाटल्या असा एकूण २० हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई लातूरचे अधीक्षक केशव राउत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर विभागाचे निरीक्षक रमेश एम.चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान संताेष केंद्रे, चालक विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली. याबाबत उदगीर आणि निलंगा तालुक्यातील पाच जणांविराेधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागरिकांनाे टाेल फ्री क्रमांकावर माहिती द्या...
लातूरसह जिल्ह्यात हाेणाऱ्या अवैध दारुविक्री, वाहतूक विराेधात कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने टाेल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. अवैध दारुविक्री विराेधात थेट यावर तक्रार करता येणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.