अवैध धंद्यावर छापा; ७ लाखांची दारू जप्त ५ जणांवर गुन्हा, लातूर पाेलिसांची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: August 8, 2023 08:02 PM2023-08-08T20:02:20+5:302023-08-08T20:02:48+5:30
औराद शहाजानी ठाण्यात चार जणांविराेधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
उदगीर/ औराद शहाजानी (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने कारमधून दारूची वाहतूक करणाऱ्याला स्थागुशाच्या पथकाने उदगीर ते ताेंडार पाटी मार्गावर अवैध दारू साठ्यासह पकडले. यावेळी ७ लाख ६ हजार ५२० रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गोविंद नामदेव बनसोडे (३२, रा. लोहारा, ता. उदगीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी-काेटमाळ राेडलगत असलेल्या शेतातील शेडमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाइल, वाहने असा एकूण ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत औराद शहाजानी ठाण्यात चार जणांविराेधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, राहुल सोनकांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, संतोष खांडेकर, नितीन कटारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, केंद्रे यांच्या पथकाने केली.
फरार आराेपी सहा वर्षांनंतर जाळ्यात...
लातुरातील गांधी चाैक पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल असलेल्या लूटमार प्रकरणातील गुन्ह्यात फरार झालेला आयूब हमीद शेख (वय ३५ रा. पेठ, ता. लातूर) याला स्थागुशाच्या पथकाने सहा वर्षांनंतर जेरबंद केले आहे. त्याला गांधी चाैक ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.