किनगावात कृषी सेवा केंद्रावर छापा; बनावट खताची विक्री, गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: June 11, 2024 07:45 PM2024-06-11T19:45:42+5:302024-06-11T19:46:44+5:30
रासायनिक खताचा अवैधरित्या खरेदी करून साठा केल्याचे आढळून आले.
लातूर: जिल्ह्यातील किनगाव (ता. अहमदपूर) येथील माऊली कृषी सेवा केंद्रावर छापा मरला. यावेळी खताचे ४० पाेते जप्त करण्यात आले असून, याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात कृषी सेवा केंद्र मालकाविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील सारोळा गावात अनेक शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र मालकाने टेम्पाेतून बनावट खताची विक्री केल्याची माहिती लातूर येथील कृषी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर जिल्हा परिषद, कृषी विभाग लातूर आणि पंचायत समिती रेणापूर, कृषी विभाग रेणापूर यांच्या संयुक्त पथकाने एका शेतकऱ्याच्या पत्र्याच्या शेडवर साेमवारी दुपारी छापा मारला.
यावेळी रासायनिक खताचा अवैधरित्या खरेदी करून साठा केल्याचे आढळून आले. यावेळी खताचे ४० पोते जप्त करण्यात आले आहेत. लातूर जि.प.चे मोहीम अधिकारी मिलिंद बीडबाग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किनगाव ठाण्यात कृषीसेवा केंद्र मालक नामदेव विश्वनाथ खेरडे याच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.