अवैध दारूप्रकरणी ढाब्यावर छापा; १० जणांना निलंगा न्यायालयाचा दंड !
By राजकुमार जोंधळे | Published: November 11, 2022 06:59 PM2022-11-11T18:59:34+5:302022-11-11T19:00:15+5:30
लातूर येथील राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
लातूर : अवैध दारू विक्रीप्रकरणी लातूर येथील राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या पथकाने छापा मारला असून, यावेळी एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ढाबाचालकाला २५ हजार आणि दहा जणांना प्रत्येकी १ हजार असा एकूण ३४ हजारांचा दंड केला आहे. ही घटना निलंगा येथे ८ नाेव्हेंबर २०२२ राेजी घडली.
औरंगाबाद येथील विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला खबऱ्याने अवैध दारू विक्री हाेत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे निलंगा येथील हाॅटेल आराध्या येथे पथकाने ८ नाेव्हेंबर २०२२ राेजी छापा मारला. या छाप्यात अवैध दारू आणि दहा जण हाती लागले. त्याचबराेबर अवैध दारूही जप्त करण्यात आली हाेती. याबाबत अवैध दारू विक्रीप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ आणि ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणी एकूण दहा जणांना अटक करण्यात आली. या दहा जणांना ९ नाेव्हेंबर राेजी निलंगा येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ढाबा मालक यांना २५ हजार आणि आरोपींना प्रत्येकी १ हजार रुपये असा एकूण ३४ हजार रुपयांचा दंड केला आहे.
ही कारवाई अधीक्षक केशव राऊत, उदगीरचे निरीक्षक आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे, अ. ब. जाधव, एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, ए. एल. कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, हणमंत मुंडे, संताेष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, जोतिराम पवार यांच्या पथकाने केली.